भैरवनाथ म्हणजे कालभैरव.गावचा रक्षणकर्ता. शिरवळचे भैरवनाथाचे मंदिर गावाच्या पूर्वेला आहे.या मंदिराकड़े जाताना वाटेत उजव्या हाताला निगडे-देशमुखांचा ऐतिहासिक वाडा आहे.या वाडयातून पुढे जाताच भैरवनाथाच्या मंदिराचे पश्चिमाभिमुख महाद्वार लागते.ते चांगलेच उंच आणि भव्य आहे.या महाद्वाराच्या कमानीची एक वेगळीच धाटणी आहे।
एके काळी या मंदिराभोवती दगड़ी तट होता.तो आता व्यवस्थित रंगरंगोटी करून पुन्हा बांधला आहे.दारातून आत गेल्यावर काही पायर्या उतरून आपण प्राकारात येतो.भैरवनाथाचे तोंड दक्षिणाभिमुख आहे.चारी बाजूंनी दगडी तट आणि उत्तरेच्या अंगाला मुख्य मंदिर आहे.सभामंडप,अंतराळ आणि देवाचा गाभारा असा सर्वसाधारण क्रम येथे नाही.पडवीवजा जागेतून एकदम देवापाशी जाता येते.
पूर्व बाजूला तटात एक दार आहे.देवालयाचे आवार बरेच मोठे आहे.तिथे सुंदर बगीचा तयार करण्याचे काम चालू आहे.सध्या या मंदिराची व्यवस्था उत्तम पाहिली जाते.